मिंधेंचे एकहाती वर्चस्व असलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने कळव्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविण्याचा घाट घातला आहे. पालिकेने विकास आराखडा तयार करताना स्थानिकांना विश्वासात न घेताच खारेगावमधील अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या घरांसह 17 रहिवासी इमारतींवर रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे रस्त्याच्या नावाखाली हजारो रहिवाशांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना बेघर करण्याचा डाव आखणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा रद्द करा, अन्यथा निवडणुका होताच रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विकास आराखडा संशयास्पद
स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि भूमिपुत्रांच्या घरावरच बुलडोझर फिरणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. हा विकास आराखडा आणि संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून हा डीपी रोड रद्द करावा म्हणून स्थानिक भूमिपुत्र गेल्या चार वर्षांपासून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.
राजकारण करणाऱ्यांना शेवटचा इशारा
एवढे करूनही न्याय मिळाला नाही तर आम्ही कोकण आयुक्तांकडे अपिल करणार आहोत. तेथे न्याय मिळाला नाही तर शासनाकडे दाद मागू. मात्र हा डीपी रोड रद्द करू असे सांगत यामध्ये राजकारण करणाऱ्यांना शेवटचा इशारा संघर्ष कृती समितीने दिला आहे.
ठाणे महापालिकेचा नुकताच नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये कळव्यातील खारेगाव येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या घरांवर रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले आहे. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांची घरे, 17 रहिवासी इमारती, ग्रामपंचायतीपासूनची 18 जुनी घरे तसेच खारेगावची ग्रामदेवता जरीमरीचे प्राचीन मंदिर तोडले जाणार आहे. महत्त्वाचे या डीपी रोडबाबत भूमिपुत्रांनी हरकती नोंदविल्या आहेत. तरी हा डीपी रोड करण्याचा घाट घातला जात असून तो रद्द करावा अशी मागणी आज भूमिपुत्रांनी पत्रकार परिषदेत केली.