‘हिट ॲण्ड रन’ प्रकरण; आठ आरोपी चार दिवसांनंतरही मोकाट

रहायला रूम दिली नाही म्हणून होम स्टेच्या मालकाला बेदम मारहाण करतानाच त्याच्या बहिणीला गाडीखाली चिरडून मारणारे आठ आरोपी चार दिवसानंतरही मोकाटच आहेत. पोलीस केवळ तपास सुरू आहे, लवकरच अटक करू अशी माहिती देत वेळ मारून नेत आहेत. मात्र या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा तरी दबाव असल्यानेच अधिक माहिती देण्यास चालढकल करत असल्याने पोलीस नेमके कुणाचे ‘मिंधे’ आहेत, असा संताप हरिहरेश्वरवासीयांनी केला आहे. दरम्यान ज्या गाडीतून आरोपी पळाले ती स्कॉर्पिओ गाडी पिंपरी-चिंचवड परिसरात सापडली आहे. परंतु आरोपींचा कोणताही मागमूस अद्यापि पोलिसांना लागलेला नाही.

पुण्यातील पिपरी-चिंचवड येथून इरप्पा धोतरे, आकाश उपटकर, आकाश गावडे, नीरज उपटकर, आशीष सोनावणे, विकी सिंग, अलिम नागूर, सचिन जमादार, आदिल शेख, सचिन टिल्लू आणि अनिल माज हे 11 जण पर्यटनासाठी हरिहरेश्वरमध्ये आले होते. शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी ममता ‘होम स्टे’ चे मालक अभी धामणस्कर यांच्याकडे राहण्यासाठी रूमची चौकशी केली. मात्र हे सर्वजण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पाहून धामणस्कर यांनी त्यांना खोली देण्यास नकार दिला असता या टोळक्याने त्यांच्यासोबत हुज्जत घालत मारहाण केली. भावाला मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची बहीण ज्योती धामणस्कर या आरडाओरड करत शेजाऱ्यांकडे मदतीसाठी जात असल्याचे पाहताच या माथेफिरूंनी तिला गाडीखाली चिरडून घटनास्थळावरून पळ काढला होता. हिट अॅण्ड रन प्रकरणातील विकास गावडे व विकी सिंग या दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. तर अन्य एका आरोपीला पोलिसांनी पकडले होते. मात्र उर्वरित आठ आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

अटक केलेल्या आरोपींचा पाहुणचार सुरू आहे का?

हिट अॅण्ड रन प्रकरणात विकास गावडे, विकी सिंगसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांची चौकशी सुरू असून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र पर्यटनासाठी आलेले हे सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असल्याने आरोपींनी दिलेल्या माहितीवरून फरार झालेल्या पर्यटकांच्या घरी धाडी का टाकण्यात येत नाहीत, असा सवाल नागरिक विचारत असून अटक केलेल्या आरोपींचा पाहुणचार सुरू आहे का, असा संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

चार दिवस उलटूनही फरार आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांना यश येत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय दबावाखाली तर तपास करणात चालढकल केली जात नाही ना, असा प्रश्न विचारला जात असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा उशारा दिला आहे.