गेल्या वर्षभरात राज्यात विविध ठिकाणी ‘हिट अॅण्ड रन’च्या घटना घडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराजवळच त्याची पुनरावृत्ती झाली आहे. मध्यरात्री एका आलिशान मर्सिडीज गाडीने 21 वर्षांच्या दुचाकीस्वाराला चिरडले असून त्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
दर्शन हेगडे असे मृत तरुणाचे नाव असून दर्शन हेगडे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे हा अपघात झाल्यानंतर मर्सिडीजच्या मस्तवाल चालकाने मदतीचा हात देण्याऐवजी धूम ठोकली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानापासून फक्त थोड्याच अंतरावर ही घटना घडल्याने ठाणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नितीन कंपनी येथे रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दर्शन हेगडे आपल्या मोटरसायकलवरून चायनीज आणण्यासाठी गेला. घरी परत जात असताना मुंबईकडे जाणाऱ्या आलिशान मर्सिडीज चालकाने दर्शनच्या बाईकला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दर्शन जागेवरच मरण पावला. त्यानंतर कारचालकाने लगेच घटनास्थळावरून पळ काढला असून तो अद्याप फरार आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू
या प्रकरणात फिर्यादी दिशीत ठक्कर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर नौपाडा पोलीस ठाण्याकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
हॉटेलमध्ये काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा
‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात बळी गेलेला दर्शन हेगडे हा तरुण पदवीचे शिक्षण घेत होता. तसेच पार्टटाइम एका हॉटेलमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. वडिलांची घंटाळी मंदिर परिसरात पानाची टपरी असून हेडगे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून वागळे इस्टेटमधील ज्ञानेश्वरनगर येथे वास्तव्यास आहेत. दर्शनच्या मृत्यूमुळे हेगडे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.