पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गणेश नाईक यांनी पहिली धडक ठाण्यात देऊन मिंधे गटाला घायाळ करण्यास सुरुवात केली आहे. पालघरचा पालकमंत्री असलो तरी ठाणे शहरात दोन महिन्यातून एकदा जनता दरबार घेणार आणि ठाण्याचा कारभार सुरळीत करणार, शहरासह जिल्ह्यात ‘ओन्ली कमळ फुलवणार’, असा आवाज नाईक यांनी दिल्यामुळे मिंधे गटात अस्वस्थता पसरली आहे. नाईक यांनी यापूर्वी अनेक वेळा मिंधेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्यांच्या मनातील खदखद आक्रमकपणे बाहेर येऊ लागल्याने गणेश नाईक को गुस्सा क्यों आया, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत मिंधे गटाला धोबीपछाड देण्याची तयारी नाईकांनी केली आहे का, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
प्रदिर्घ काळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्याचे विद्यमान वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची कोंडी करण्यात आली होती. नवी मुंबई शहरातील अनेक निर्णय घेताना त्यांना डावलण्यात आले होते. नाईक यांच्यापेक्षा बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना मिंधे गटाकडून नेहमीच झुकते माप दिले जात होते. 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करताना नाईक यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. नाईक यांची कोंडी करण्यासाठी अनेक अधिकारी मनमानी पद्धतीने नवी मुंबई पाठविण्यात आले होते. अधिकारी नाईक यांना जुमानत नव्हते. याचा वचपा काढण्यास नाईक यांनी आता सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांनी मिंधे गटावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. मात्र मंगळवारी त्यांनी ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शहरात जनता दरबार घेण्याची घोषणा करून मिंधे गटापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. गणेश नाईक हे सुमारे 10 वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांचा महिन्यातून एकदा जनता दरबार भरवला जात होता. त्यात त्यांनी कोणताही खंड पडू दिला नाही. आता पुन्हा त्यांनी पालघरचे पालकमंत्री असतानाही ठाण्यात जनता दरबाराची घोषणा केल्यानंतर मिंधेंची अस्वस्थता वाढली आहे.
आमचे नेते देवेंद्र फडणवीसच
जून 2024 : एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आहेत. आमचे नेते हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असे गणेश नाईक यांनी जाहीररीत्या मिंधे गटाला एका कार्यक्रमात डिवचले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
14 गावांच्या निर्णयात डावलले
सप्टेंबर 2024 : राजकीय फायदा उचलण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. केवळ स्वतःचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी या गावांच्या विकासाचा भार नवी मुंबई महापालिकेवर टाकला. नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या या निर्णयाला नाईक यांनी कडाडून विरोध केला. या गावांचा विकास राज्य सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी करून एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते.
नवी मुंबईत चुकीचे घडले
8 जानेवारी : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई शहरात अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. मात्र महायुतीचे सरकार असल्यामुळे नाइलाजास्तव त्या सहन कराव्या लागल्या. या चुकीच्या गोष्टींचा मोठा फटका नवी मुंबई महापालिकेला बसला आहे, असे जाहीर वस्त्रहरण गणेश नाईक यांनी नवी मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या
कार्यक्रमात केले होते.
संजीव नाईकांचा पत्ता कट
मार्च 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने संजीव नाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. फडणवीस यांनी नाईक यांना प्रचारही सुरू करण्यास सांगितला होता. मात्र मिंधे गटाने ही जागा प्रतिष्ठेची करून ऐनवेळी संजीव नाईक यांचा पत्ता कट केला आणि नरेश म्हस्केंना उभे केले. त्यानंतर नाईक समर्थकांचा नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये मोठा उद्रेक झाला होता.
मनमानी प्रभाग रचना
फेब्रुवारी 2022 : नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये नाईक यांची कोंडी करण्यासाठी मिंधे गटाने मोठी व्यूहरचना केली होती. 111 प्रभागांमध्ये 11 प्रभागांची वाढ करून एकूण प्रभागांची संख्या थेट 122 पर्यंत नेली होती. या प्रभाग रचनेला गणेश नाईक यांनी कडाडून विरोध करून मिंधे गटाला लक्ष्य केले होते.