आधी दोघींशी लग्न. मग तिसरीसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी सुपारी फोडली. हे कमी म्हणून की काय चौथीबरोबर संसार थाटण्यासाठी बोलणी करून मुंडावळ्या बांधण्याच्या तयारीत असणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या ठगाची वरात लग्न मंडपातून निघण्याऐवजी पोलीस ठाण्यात निघाली आहे. नेरळ येथे हा प्रकार घडला असून योगेश हुमने (३३) असे आरोपीचे नाव आहे. लग्न करून नववधूचे दागिने आणि आर्थिक लूट करून चैनी करण्यासाठी अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी योगेशवर गुन्हा दाखल झाला आहे.
योगेश हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील जामगे येथील राहणारा आहे. दाखल तक्रारीच्या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांच्या पथकाने आरोपीला शिताफीने अटक केली. पत्नीच्या नावावर असलेली कार आपल्या नावावर करण्यासाठी योगेश नेरळला पत्नीला भेटायला आला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलीस खाक्या दाखवताच योगेशचे कारनामे बाहेर आले.
योगेशने आजवर अनेक अविवाहित मुलींची फसवणूक केली आहे. दोन मुलींशी लग्न करून तिसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रमदेखील त्याने पार पाडला होता. त्यातच चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्यासाठी मुलीच्या घरच्यांशी बोलणीदेखील सुरू असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे फसवणूक झालेल्या महिलांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचादेखील समावेश आहे.
पत्नीनेच फोडले बिंग
नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले येथील 34 वर्षीय पीडित विवाहितेने योगेश विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पती मानसिक, आर्थिक फसवणूक करत असून त्याचे या आधी लग्न झाले असताना माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे म्हटले होते. यानंतर योगेशच्या भामटेगिरीचे बिंग फुटले आणि त्याचे कारनामे चव्हाट्यावर आले.
ही होती मोडस ऑपरेंडी
ज्यांचे लग्न जुळत नाही किंवा ज्यांचे वय अधिक झाले आहे अशा महिलांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून योगेश ओळख निर्माण करायचा. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम तो करीत होता. विवाहित असतानाही त्याने अविवाहित असल्याचे भासवून अनेक पीडितांना लुटले आहे.