
कल्याणहून दादरला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये एका तरुणाने तीन प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली. या हल्ल्यात तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. अक्षय वाघ, हेमंत काकरिया, राजेश चांगलानी अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
शेख जिया हुसेन असे 19 वर्षीय आरोपीचे नाव आहे. सकाळी 9:47 वाजता कल्याणहून दादरला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये कल्याण ते डोंबिवलीदरम्यान आरोपी आणि पीडितांमध्ये वाद झाला. धक्का लागण्याच्या क्षुल्लक कारणातून हा वाद झाला. या वादातून शेखने खिशातून चाकू काढला आणि तीन प्रवाशांवर हल्ला केला.
डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. काही तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.