12 लाखांची खंडणी उकळताना महिला वकिलाला अटक; ट्रॅपसाठी खेळण्यातील नोटा वापरल्या

हॉटेल चालकाकडून 12 लाख रुपयांची खंडणी घेताना अक्षता उपाध्याय या महिला वकिलावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी झडप घातली आहे. या महिलेने हॉटेल व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. नंतर हा सौदा 12 लाखांवर नक्की झाला. त्यानुसार तक्रारदारांनी 10 हजार रुपये किमतीच्या खऱ्या आणि 11 लाख 90 हजार रुपये किमतीच्या खेळण्यातील नोटांचा वापर केला.

सीबीडी बेलापूर येथील हॉटेल प्रणाम फाईन डायनिंगचे चालक किशोर शेट्टी यांनी अक्षता उपाध्याय या महिला वकिलाच्या विरोधात तक्रार केली होती. या महिलेने अरुण शेट्टी यांच्या लक्ष्मी हॉटेल, अश्वीथ बार, महेश शेट्टी यांच्या महेश लंच होम, मनोहर शेट्टी यांच्या आरुष फाईनडायनिंग, अक्षय शेट्टी यांच्या निमंत्रण, सदाशिव शेट्टी यांच्या कॉर्पोरेट हॉटेलच्या विरोधात महापालिकेकडे तक्रार केली होती. हे सर्वच हॉटेल बेकायदेशीरपणे चालवले जातात. त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी उपाध्याय हिने किशोर शेट्टी यांच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार शेट्टी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अटक केली.