Thane news : विमानाने येऊन महाराष्ट्रात घरफोड्या; त्रिपुरातील चोरट्याची ‘फाईव्ह स्टार’ सवारी

चोरीसाठी दुसऱ्याची बाईक किंवा पळवलेल्या गाड्या अनेकदा वापरल्या जात असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र त्रिपुरातील एक चोरटा चक्क विमानाने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये येऊन घरे साफ करत असल्याचे समोर आले आहे. राजू शेख उर्फ बंगाली असे या ‘फाईव्ह स्टार’ घरफोड्याचे नाव असून त्याला ठाण्याच्या गुन्हे शाखा 5 च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 7 गुन्ह्यांची उकल केली असून श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वागळे इस्टेट येथील कामगार नाका परिसरात सोन्याचांदीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीचे दागिने असल्याने ते चोरीचे असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजू शेख उर्फ बंगाली याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो त्रिपुरातील कांथाना बाझार परिसरात राहणार असून त्याच्याकडून दागिने चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे. या भामट्याविरोधात गुजरात महाराष्ट्र व इतर राज्यांत गुन्हे दाखल असून सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पुलाखाली राहून रेखी

विमानाने मुंबईत आल्यानंतर तो नाला किंवा उड्डाणपुलाखाली राहून परिसराची रेखी करायचा. महिनाभर रेखी केल्यानंतर संधीचा फायदा घेऊन तो घरफोडी करायचा आणि पोबारा करायचा. चोरलेल्या दागिन्यांची विक्री करून तो पुन्हा विमानानेच त्रिपुरा गाठायचा. रेल्वे किंवा बसने प्रवास केल्यास पोलीस पाठलाग करून बेड्या ठोकतील या भीतीने त्याने विमानाने प्रवास केल्याचे समोर आले आहे.

दागिणे लंपास

पेण तालुक्यातील मुंढाणी-बेणसे येथे राहणारे नामदेव घासे यांचे घर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. नामदेव हे नेरुळला राहणाऱ्या आपल्या मुलाकडे गेले असता. त्यांच्या घराचे कौल काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, कानातील चेन, कानातले, रोख रक्कम असा एकूण 3 लाख 76 हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम करीत आहे.

देशी बारमध्ये चोरी

वसई पूर्व परिसरात वसंत नगरीच्या दिवाण भाजी मार्केटसमोरील विनीत देशी बारमधून रोख रक्कम चोरली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने बारच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे लोखंडी ग्रिल उचकटून बारमध्ये प्रवेश केला. चोरट्याने बारमधील 45 हजारांची रोख रक्कम आणि 4 हजारांचा सीसीटीव्ही डीव्हीआर चोरला असून याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.