
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या गंभीर होत चालला आहे. दररोज महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये छेढछाढ, विनयभंग आणि बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशातच आता ठाण्यामध्ये शाळेत निघालेल्या तीन शाळकरी मुलींचा सेल्फी काढण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 37 वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (21 फेब्रुवारी 20250) उल्हासनगरच्या टाउनशीपमधील ओटी सेक्शन परिसरात तीन अल्पवयीन मुली (एक 8 वर्षीय आणि दोन 10 वर्षीय) या शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत उभ्या होत्या. याच दरम्यान एक स्थानिक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि जबरदस्ती सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मुली घाबरल्या आणि त्यांनी बॅग तिथेच फेकून घराच्या दिशेने पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मुलींच्या मागे घरापर्यंत पळत गेला आणि घरात घुसून पुन्हा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू लागला. मुलींनी आरडाओरडा केल्यामुळे शेजारी सावध झाले आणि मुलींना आपल्या ताब्यात घेतलं
याप्रकरणी तत्काळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता, पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती आणि अनुसचित जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.