लोखंडी रॉडने डोकं फोडले, हाताचे हाडही मोडले; अंगणातला दगड हलवला म्हणून भावावर जीवघेणा हल्ला

भावाने नवे घर बांधल्याचा पोटशूळ उठल्याने चुलत भावाने त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याचे डोके फोडले आणि हातावर दांडक्याचा जोरदार घाव घालत हाडही मोडून टाकले. घरासमोरील अंगण नीटनेटके करण्यासाठी वेशीवरचा दगड उचलला या क्षुल्लक कारणावरून हा हल्ला करण्यात आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हल्ला झालेल्या तरुणाचे प्राण वाचले असून आरोपी नारायण भोईर याला पाली पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला कोठडी ठोठावण्यात आली आहे.

ठाण्यातील रामचंद्रनगर नंबर 2 येथे राहणारे अनिल भोईर यांचे गावातील घर सुधागड तालुक्यातील नाडसूर येथे आहे. अनिल भोईर यांनी आपल्या जुन्या घराची डागडुजी करून तेथे नवीन घर बांधले. नवे घर बांधले म्हणून त्यांनी अंगणही नीटनेटके करून घेतले. त्यानंतर ते ठाण्याला निघाले. वाटेतच घोड्याचा डोह-लेकसिटीसमोर त्यांचा चुलत भाऊ नारायण भोईर याचा माऊली ढाबा आहे. अनिल भोईर त्याला भेटण्यासाठी गेले असता अंगणातला हद्दीचा दगड का उचलला असे सांगत नारायण भोईर याने वाद घातला.

अंगण नीटनेटके करण्यासाठी दगड उचलला होता. मात्र तो पुन्हा त्याच जागी ठेवला आहे. ते तू बघून घे असे अनिल भोईर यांनी सांगताच नारायण भोईरने बेसावध असलेल्या अनिलवर मागून डोक्यावर रॉडने जोरदार घाव घातले. अनिल जीव वाचवण्यासाठी धावत असताना त्याच्या हातावरही दांडक्याचे घाव घालून नारायणने अनिलच्या हाताचे हाड मोडून ठेवले. या हल्ल्याने अनिल भोईर जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

दैव बलवत्तर म्हणून प्राण बचावले

आजूबाजूच्या लोकांनी धावाधाव करून बेशुद्धावस्थेत असलेल्या भोईर यांना आधी पाली येथील ग्रामीण रुग्णालय, त्यानंतर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलवले. रात्री उशिरा त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण बचावले. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम मारुती पवार व टीम तपास करीत आहे.