
धावत्या स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी कर्जतमध्ये उघडकीस आली होती. मात्र या प्रकरणातील आरोपी व बसचा क्लिनर करण पाटील याला वाचवण्यासाठी मिंधे गटाचा सरपंच दबाव टाकत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान तक्रार दाखल करण्यास आलेल्या पालकांना पोलिसांनी तब्बल सहा तास बसवून ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे.
खालापूर तालुक्यातील लोधिवली सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणाऱ्या कर्जत येथील चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर बसवर क्लिनर म्हणून काम करणाऱ्या कर्जतच्या वदप येथील करण पाटील या नराधमने लैंगिक छळवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत पीडित विद्यार्थिनींनी घरी पालकास सांगितल्यावर घटना समोर आली. गेले वर्षभर हा नराधम व्हॅनमधून शाळेत जात असताना विद्यार्थिनींसोबत लैंगिक चाळे करीत होता. यासाठी तो लहान मुलींना धमकावतदेखील होता. पालकांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलीस प्रशासनाकडून पालकांना दुय्यम वागणूक मिळाली. सहा तास थांबून रात्री उशिरा तक्रार नोंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी हा मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याने या प्रकरणात तकार दाखल करू नये यासाठी सरपंच रोहित पाटील हा पालकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
आपण प्रकरण बाहेर मिटवू!
अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी कर्जत पोलीस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलीस ठाण्याबाहेरच त्यांना अडवत मिंधे गटाचे सरपंच रोहित पाटील यांनी तक्रार देऊ नका. आपण हे प्रकरण बाहेरच मिटवू असे दरडावले असा आरोप पालकांनी केला आहे. पोलिसांवरदेखील हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुरुवातीला तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या पालकांना पोलिसांनी सहा तास थांबवून ठेवल्याचा आरोप होत आहे.
सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
विद्यार्थिनींवरील अत्याचाराची घटना समोर येताच कर्जतमधील पालक संतप्त झाले आहेत. आज अनेक पालकांनी पोलीस ठाण्यावर धडक देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. करण पाटीलसारख्या नराधमांवर वचक बसावा यासाठी सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा तसेच बसेसमध्ये सक्तीने महिला वाहकांची नेमणूक करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
“आम्ही तत्काळ तक्रार दाखल करून घेत आरोपीस अटक देखील केलेली आहे. कोणाचाही आमच्यावर दबाव नसून आम्ही योग्य ती कारवाई करू. आरोपीला सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.”
– डी. डी. टेळे, पोलीस उपअधीक्षक, कर्जत.