
नौपाडा, चरई परिसरात एकाच रात्री 14 दुकाने फोडणाऱ्या नेपाळी दुकलीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. महंत भाने कामी व विष्णू रगवा कामी अशी त्यांची नावे असून या चोरट्यांकडून रोख रकमेसह हत्यारे, चार मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. या नेपाळी दुकलीने मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात केलेले नऊ गुन्हेदेखील उघडकीस आणले असून त्यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे.
ठाण्याच्या गजबजलेल्या चरई भागात 12 मार्च रोजी पहाटे एकाच रात्रीत 14 दुकाने फोडण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नौपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून दुकाने फोडणाऱ्यांचा छडा लावला आहे. पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशनपासून मीरा रोड व उल्हासनगरपर्यंत 90 ते 100 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. हे फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे महंत कामी व विष्णू कामी या दोघांना पकडले आहे.
अशी होती मोडस ऑपरेंडी
ठाण्यातील 14 दुकाने फोडणारे दोघेजण हे नेपाळी असून मीरा रोड व उल्हासनगर परिसरात ते राहत होते. ते वॉचमन म्हणून काम करायचे. महंत हा मार्केट परिसरात असलेल्या बंद दुकानांचे शटर उचकटून आत शिरायचा आणि आतील माल लंपास करायचा. त्याचा साथीदार विष्णू हा दूरवर उभा राहून त्याची रेकी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण चोरीचा छडा लावण्यात आला आहे.