Thane crime – दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट; विरारमध्ये प्रियकराचा प्रेयसीवर चाकूहल्ला, लाथ मारत जबडाही फोडला

लग्नाला घरच्यांची संमती असतानाही सोबत फिरायला येत नाही. तसेच दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करते म्हणून विरारमध्ये एका प्रियकराने प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने लाथ मारत तिचा जबडाही फोडला. या घटनेत जखमी झालेल्या प्रेयसीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पोलिसांनी प्रियकर अक्षय पाटील याला बेड्या ठोकल्या आहेत.

विरार पूर्वेच्या घासकोपरी गावात राहणारा तरुण अक्षय पाटील याचे त्याच्याच गावात राहणाऱ्या 23 वर्षीय भाविका गावड हिच्याशी गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. एक महिन्यापूर्वी अक्षयच्या कुटुंबीयांनी भाविकाच्या घरच्यांशी लग्नाची बोलणी झाली होती. भाविका फार्मासिस्टची नोकरी करत असून पुढे आणखीन शिक्षण घ्यायचे आहे. तसेच सध्या एक वर्ष लग्न करता येणार नाही असे भाविकाच्या घरच्यांनी सांगितले.

दरम्यान, फिरायला चल असे सांगितले असता भाविका टाळाटाळ करीत असल्याचा राग मनात धरून अक्षयने प्राणघातक हल्ला केला. धक्कादायक म्हणजे अक्षयने भाविकाच्या आईला फोन करून तुमच्या मुलीवर हल्ला केल्याचेही सांगितले. या घटनेची दखल घेत पोलिसांनी अक्षयला तत्काळ अटक केली.