
निसर्गाचे वरदान लाभलेल्या ठाणे खाडीची सध्या दुर्दशा झाली आहे. नाल्यांचे घाणेरडे पाणी खाडीमध्ये सोडल्याने अमोनिकल नायट्रोजनची पातळी वाढली असून जलजीवनच धोक्यात आले असल्याचा धक्कादायक पर्यावरण अहवाल ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. खाडीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला बेकायदा भराव आणि सांडपाणी यामुळे प्रदूषणाची लाट उसळली आहे. तातडीने ही लाट रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास खाडीचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीतीदेखील पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ठाणे शहराला 30 किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीची जपणूक करण्याऐवजी दिवसेंदिवस त्यातील प्रदूषण वाढत चालल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध नाल्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करता राजरोसपणे खाडीमध्ये सोडण्यात येते. परिणामी या पाण्याला उग्र वास येत असून माशांचे जीवन संकटात सापडले आहे. महापालिकेच्या प्रदूषण विभागाने सात ठिकाणचे खाडीतील पाण्यांचे नमुने तपासले. त्यात काही ठिकाणी 4.0 एमजी/एलपेक्षाही जास्त विरघळलेला ऑक्सिजन आढळून आला. तसेच अमोनिकल नायट्रोजनचे प्रमाणही मयदिपेक्षा अधिक वाढले आहे. माशांच्या प्रजननाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे अनुमान पालिकेच्या अहवालात काढले आहे.
- या उपाययोजनांची गरज
- नाल्यांमध्येच पाण्यावर प्रक्रिया करा
- नाल्यांमध्ये घनकचरा आणि सांडपाणी सोडणे तातडीने बंद करा
- झोपडपट्टीच्या जवळून जाणाऱ्या मोठ्या नाल्यांवर काँक्रीटचे स्लॅब टाकणे आवश्यक
- नागरिकांमध्ये जनजागृती.
ठाणे महापालिकेने शहरातील सर्व नाल्यांचा सर्वेक्षण अहवाल तयार करून त्यावर प्रक्रिया कशी करायची यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच भूजल पातळी वाढवण्याबाबत उपाययोजना आखाव्यात अशी सूचना अहवालात करण्यात आली आहे.
ठाणे शहरात 35 तलाव असून त्यातील पाणीही तपासण्यात आले आहे. दिव्याच्या तलावामध्ये असलेल्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मानांकनानुसार कमी असल्याचे अनुमान काढले आहे.
एसटीपी प्लॅण्टची क्षमता वाढवणार
ठाणे शहरातील एसटीपी प्लॅण्टची क्षमता सध्या 80 टक्के एवढी आहे. ती 106 एमएलडीपर्यंत वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी 2049 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेतली आहे. नाल्यांमधील पाण्यावर या प्लॅण्टमध्ये प्रक्रिया केल्यानंतरच ते खाडीत सोडावे लागेल. – मनीषा प्रधान, (मुख्य पर्यावरण अधिकारी)