ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशाचा ‘कचरा’, सीपी टँकमध्ये डम्पिंगचा डोंगर; वागळे परिसरात पुन्हा दुर्गंधी

वागळे इस्टेटच्या सीपी टैंक येथे साचलेला कचरा 30 दिवसांत हटवण्यात येईल, असे आश्वासन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. मात्र आयुक्तांच्या या आदेशाचा पालिका अधिकाऱ्यांनी अक्षरशः कचरा केला आहे. ठाण्याच्या सीपी टँक येथे डम्पिंगचा डोंगर जैसे थे आहे. ढीग हटवण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वागळे परिसरात दुर्गंधीने पुन्हा डोके वर काढले आहे. दरम्यान भरउन्हाळ्यात या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत.

सीपी तलाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे कचराकोंडी झालेल्या ठाणे महापालिकेने शहरात गोळा होणारा कचरा सध्या भिवंडीच्या आतकोली येथे टाकण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान सीपी तलाव येथील नागरिकांनी आंदोलन करत लवकरात लवकर येथील कचरा हटवा अन्यथा घंटागाड्या फोडू, असा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने सीपी टँक येथे साचलेला कचरा तातडीने आतकोली क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची 12 मार्चपासून प्रक्रिया सुरू केली. तीन सत्रांत जादा वाहनांचा वापर करून कचरा स्थलांतरित करण्यात येणार होता. मात्र महिना उलटून गेला तरी या ठिकाणी कचऱ्यांचा डोंगर कमी झालेला नाही.

ठाणे शहर आणि कळवा येथील कचरा सीपी टँक येथे एकत्र होतो. येथून तो प्राथमिक प्रक्रिया करून क्षेपणभूमीवर पाठवला जातो. दररोज सुमारे 600 टन कचऱ्याच्या हाताळणीचे हे चक्र 24 तास सुरू असते. वागळेतील उद्योजकही त्रस्त झाले आहेत. हे केंद्र बंद करण्याचे सूतोवाच तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले होते. त्यानुसार 20 ऑगस्ट 2024 ही डेडलाईन देण्यात आली होती. याआधी अनेक आयुक्तांनी नवनवीन डेडलाईन दिल्या होत्या