
कोरोना काळात जीवाची बाजी लावून डॉक्टर्स, परिचारिका तसेच असंख्य कर्मचाऱ्यांनी रुग्ण सेवा केली. मात्र आता हेच कोविड योद्धे ठाणे महापालिकेला जड होऊ लागले आहेत. पालिकेने कोरोना काळात कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या 650 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 100 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या हातात नारळ देत त्यांना घरी पाठवले आहे. संतापजनक म्हणजे कामावरून कमी करण्यासाठी या कर्मचाऱ्यांवर एक ना अनेक आरोपांच्या ठपक्यांची जंत्रीच लावण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर निर्दयीपणे वरवंटा फिरवल्याने संताप व्यक्त होत असून वा रे ठाणे महापालिका.. कोविडमध्ये राबवून घेतले आणि आता वाऱ्यावर सोडले, अशा प्रतिक्रिया ठाणेकरांमधून उमटल्या आहेत.
■ ठाणे पालिकेच्या माध्यमातून कोविड काळात रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, या उद्देशाने डॉक्टर, नर्सेस आदींसह इतर सुमारे 650 च्या आसपास कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात आली होती. कोरोना गेल्यानंतरही आजही या कर्मचाऱ्यांना दरमहा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. सध्या कोरोना नसल्याने या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रे, रुग्णालय आणि प्रसूतिगृहात कामासाठी ठेवण्यात आले आहे. आम्हाला सेवेत कायम करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली होती.
– पालिकेत सध्या नव्याने भरती प्रक्रिया होत नसल्याने आणि सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही दिवसागणिक वाढत जात असल्याने महापालिकेने या कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवले आहे. मात्र कोविड संपल्यानंतर आता हेच कोविड योद्धे पालिकेला जड झाले आहेत
– पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध आरोप ठेवत 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. त्यामुळे कोरोना काळात कौतुक करणाऱ्या पालिकेने आता गरज संपल्यानंतर नारळ दिल्याने या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे
आता काढायचे कसे… म्हणून केले हे आरोप
गेल्या अनेक महिन्यांपासून या 100 कर्मचाऱ्यांना कायमचे घरी बसवण्यासाठी पालिका काहीना काही करणे शोधत होती. त्यासाठी या कर्मचाऱ्यांवर मर्जीनुसार कामावर येणे, कामचुकारपणा, डॉक्टर, नर्सेस आदींसह अधिकाऱ्यांशी उद्धटपणे बोलणे, सलग रजेवर जाणे, त्यानंतर पाच ते सात महिन्यांनंतर पुन्हा कामावर रुजू होणे, असे आरोप करण्यात आले आहेत.
कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे जे प्रामाणिकपणे काम करतात त्या कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यापलीकडे काहीच मार्ग नव्हता. या कारवाईमुळे आता इतर कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल. – उमेश बिरारी, उपायुक्त, ठामपा.