![ganapati_pic](https://www.saamana.com/wp-content/uploads/2017/08/Ganapati_pic-696x447.jpg)
लाखो भक्तांच्या जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव यापुढे पर्यावरणपूरकच साजरा होणार आहे. विशेष म्हणजे ठाण्यात पीओपीच्या मूर्तीना बंदी घालण्यात आली असून महापालिकेने तशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गणपतीच्या मूर्ती शाडूच्याच बनवण्याचे बंधन मूर्तिकारांना घातले असून ही मार्गदर्शक तत्त्वे नवरात्रोत्सवालादेखील लागू राहणार आहेत. त्याचे पालन न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाणे महापालिकेने दिला आहे.
ठाणे शहरात दरवर्षी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणपती बाप्पा व देवीची सजावट पाहण्यासाठी विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. पीओपीच्या मूर्तीमुळे तलावांमधील पाणी हे दूषित होत असून त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन यापुढे फक्त शाडूच्याच मूर्ती बनवाव्यात असे आदेश महापालिकेने मूर्तिकारांना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची विक्री केली जाते तेथे मंडपाबाहेर शाडूच्या मूर्ती उपलब्ध आहेत असे फलक लावणे बंधनकारक केले आहे.
जागा पालिका देणार
गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांना दरवर्षी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. आता शाडू माती, जागा आणि इतर सुविधा ठाणे महापालिका उपलब्ध करून देणार आहे. यंदा महापालिका प्रशासनाने मागील महिन्यात गणेशोत्सव मंडळांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व अडचणी तसेच पर्यावरण आणि भक्तांच्या भावना लक्षात घेऊन महापालिकेने आता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत
या साहित्याचा वापर करा
■ उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनी रंगासाठी हळद, चंदन, गेरू यांचा वापर करावा. पूजेसाठी फुले, वस्त्र, पूजा
साहित्य पर्यावरणपूरक असावे. काच, धातूपासून बनविलेल्या ताट व वाट्यांचा वापर करावा. पानांच्या पत्रावळींचा समावेश असावा. प्लेटसाठी केळी व इतर पानांच्या पत्रावळींचा समावेश असावा. ■ प्लॅस्टिकचे साहित्य वापरू नये
अशा आहेत अटी व शर्ती
■ मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी तसेच मूर्तीच्या साठवणुकीकरिता प्रभाग कार्यालयार्माफत परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
■ शाडू मातीच्या मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनी जागेसाठी अर्ज केल्यास ते स्वतः मूर्तिकार असणे आवश्यक आहे. मूर्ती बनविण्यासाठी महापालिकेच्या प्रदूषण विभागाशी संपर्क साधावा लागेल.
■ शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना या वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेमार्फत निःशुल्क जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच आपण शाडूच्या मातीनेच मूर्ती घडवू याची लेखी हमी द्यावी लागेल.