
ठाणे जिल्ह्यातील मातांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय वरदान ठरत आहे. नुकत्याच मुंब्यातील एका २० वर्षीय महिलेवर सिझेरियन केल्यानंतर मातेने चक्क तिळ्यांना जन्म दिला. दोन मुले आणि एक मुलगी असून मायलेक सुखरूप आहेत. आज त्या चौघांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान, रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृह आणि डॉक्टरांच्या मेहनतीनंतर मातेच्या पदरात तिळं पडले आहे.
बाळंतपणासाठी खासगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते. मात्र याला ठाणे सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे. रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडतात. प्रसूतिगृहात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली.
प्रसूतीच्या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भूल तज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. रुपाली यादव, डॉ. प्रकाश बोरुळकर, डॉ. शैलेश गोपनपल्लीकर, डॉ. राहुल गुरव, डॉ. सिद्धार्थ शहा, एसएनसीयू परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
सोनोग्राफी केली आणि…
सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने दिलेल्या सर्व सूचना व पथ्य पाळून महिलेने वेळोवेळी तपासणी केली. १८ फेब्रुवारी रोजी त्या महिलेची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. तिला एक मुलगी आणि दोन मुले झाली.