
देशातील सर्वात मोठी उद्योजकांची नगरी म्हणून एकेकाळी नावाजलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील लघुउद्योजकांना खंडणीसाठी गुंडांकडून धमक्या येऊ लागल्या आहेत. कधी कंत्राट देण्यासाठी दबाव तर कधी काम बंद करण्याची धमकी अशा दादागिरीला कारखानदार वैतागले आहेत. याबाबत वारंवार पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या, पण त्याकडे पोलिसांनी राजकीय दबावापोटी कानाडोळा केल्याने या उद्योजकांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. या खंडणीखोरांचा ठाण्यातील आका कोण, असा संतप्त सवाल उद्योजकांनी केला आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे शहरात अनेक लघुउद्योजक वर्षानुवर्षे आपला व्यवसाय करीत आहेत. रासायनिक कारखान्यापासून इंजिनिअरिंग कारखानदारीपर्यंत असंख्य कारखाने या भागात आहेत. आधीच इथले लघुउद्योजक सरकारी चाचक अटींना कंटाळले असतानाच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना खंडणीसाठी धमक्या येऊ लागल्या असल्याने व्यापारी, उद्योजक धास्तावले आहेत. याप्रकरणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकारी तसेच शहरातील अनेक संस्थांचे उद्योजक सदस्यांनी नुकतीच ठाण्याचे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी, लघुउद्योजकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दीर्घकाळ चर्चा करण्यात आली.
– ठाण्यात व्यवसाय करणे कठीण झाले असून असुरक्षित वाटत असल्याची भावना लघुउद्योजकांनी पोलीस अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत मांडली. आपली व्यथा मांडून त्याकडे लक्ष देण्यास पोलिसांनी सांगितले.
– ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सचे सचिव भावेश मारू, उपाध्यक्ष आशिष शिरसाट, कीर्ती पांचाल, निखिल सुळे, अंजुम काझी, मेहुल मेहता, एकनाथ सोनवणे आदींनी आपल्याला येणाऱया अडचणी सांगितल्या.
– या चर्चेच्या वेळी अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज सिरसाठ, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आदी अधिकारी उपस्थित होते.
वागळे इस्टेटमध्ये सर्वात जास्त त्रास
वागळे इस्टेट परिसरात लघुउद्योजकांचे सर्वात जास्त छोटे मोठे कारखाने आहेत. मात्र आता हेच उद्योजक भीतीच्या छायेत असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असताना या भागात खंडणीखोरांवर वचक राहिला नाही. खंडणीखोरांकडून होणारा मानसिक त्रास कमी झाला नाही तर आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. – संदीप पारीख अध्यक्ष – टिसा संघटना, ठाणे
खंडणीखोरांवर कठोर कारवाई करू
उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ठाणे पोलिसांची आहे. उद्योजकांना खंडणीच्या माध्यमातून त्रास दिला जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. खंडणीखोरांवर कठोर कारवाई करू. व्यापाऱयांना कोणतीही अडचण असल्यास 112 क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष निदर्शनास आणावी. – डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण सहपोलीस आयुक्त, ठाणे