पीडितेवर भाजपचा दबाव; प्रकरण दडपण्यासाठी घरी जाऊन धमक्या; महिला नेत्याच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार

भाजपच्या जिल्हा महिला सरचिटणीसच्या मुलाने अत्याचार केलेल्या अल्पवयीन मुलीवर तक्रार मागे घेण्यासाठी आता भाजपकडून दबाव आणला जात आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी या मुलीच्या घरी जाऊन तिला धमक्या देऊ लागले आहेत. या मुलीच्या नातेवाईकांनाही त्रास देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या मुलीसह तिचे कुटुंब आणि नातेवाईक प्रचंड दहशतीखाली आले आहेत. दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या सहा महिन्यांपासून या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवणारा मनीष म्हात्रे याची रवानगी आता न्यायालयाने जिल्हा कारागृहात केली आहे.

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मनीष म्हात्रे यांची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्यास सुरुवात केली आहे. पीडित मुलीच्या घरी दबाव टाकण्यासाठी काही राजकीय मंडळी ये-जा करीत आहेत. मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना उलटसुलट प्रश्न विचारून त्रास दिला जात आहे. जर प्रकरण मागे घेतले नाही तर गंभीर गुन्ह्यात अडवण्याची धमकीही या कुटुंबाला दिली जात आहे.

… तर तीव्र आंदोलन छेडणार

प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणणाऱ्या नेत्यांनी थोडे तरी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी आणि नैतिकतेचे भान त्यांनी ठेवावे. जर दबाव आणून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे यांनी दिला आहे.

आरोपीची आई वंदना म्हात्रेची कमिटी अबाधित

आरोपी मनीष म्हात्रे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने पेण पोलीस ठाण्यावर धडक दिली होती. आरोपीच्या आई वंदना म्हात्रे यांना त्वरित जिल्हा शांतता कमिटीवरून बरखास्त करावे अशीही मागणी यावेळी करण्यात होती. मात्र जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वंदना म्हात्रे यांना या समितीवरून दूर केलेले नाही. त्यामुळे प्रशासन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे यांनी केला आहे.