ठाणेभूषण रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचे निधन

ठाणे भूषण पुरस्काराचे मानकरी आणि गुजरातचे रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचे आज ठाणे मुक्कामी दुःखद निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात क्रिकेटपटू अतुल आणि कन्या असा परिवार आहे.

तुकाराम सुर्वे हे 1995 साली स्थपन झालेल्या ठाणे फ्रेंड्स युनियन आणि मफतलाल क्रिकेट क्लबचे ते कार्यवाहक होते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या 14,16 वर्षाखालील संघाचे ते प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. 1982 ते 1996 दरम्यान ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सहा रणजी सामन्यांचे ते समन्वयक होते.भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या जोडीने तुकाराम सुर्वे गुजरातच्या डावाची सुरुवात करत असत. एक चपळ आणि दक्ष यष्टीरक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. यंदा शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीने त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता. ठाणे फ्रेंड्स युनियन संघाचा इंग्लड आणि केनियचा दौरा त्यांनी अनेक वर्षे आयोजित केला होता. मदन नाखवा यांच्यापाठोपाठ आज ठाणेकरांनी जेष्ठ क्रिकेटपटू तुकाराम सुर्वे यांना गमावले असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ क्रिकेटपटू हरेश्वर मोरेकर यांनी दिली.