
आगासन गावातील शेतकऱयांच्या शेतजमिनी आणि राहत्या घरांवर ठाणे महापालिका प्रशासनाने मनमानी पद्धतीने आरक्षण टाकले आहे. या अन्याय्यी कारवाईमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून त्यांचे उपजीविकेचे साधन कायमस्वरूपी नष्ट होणार आहे. त्यामुळे पालिकेने टाकलेले आरक्षण तातडीने हटवण्यात यावे यासाठी येथील शेतकऱयांनी आणि ग्रामस्थांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
दिवा परिसरातील आगासन गावातील शेतजमिनीवर ठाणे महापालिका प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आरक्षणे टाकली आहेत. या आरक्षणांना शेतकरी आणि ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. मोठय़ा प्रमाणात हरकती घेतल्या आहेत. मात्र त्यानंतरही पालिका प्रशासन हे आरक्षण उठवण्याचे नाव घेत नाही. मनमानी पद्धतीने टाकलेली ही आरक्षणे तातडीने उठवण्यात यावीत यासाठी येथील शेतकऱ्यांनी शिवसेना दिवा शहर संघटक आणि आगासन गाव बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी माजी आमदार सुभाष भोईर, उदय मुंडे, शाखाप्रमुख अनिकेत सावंत आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही निवेदन दिले.
मोकळय़ा जागांवर आरक्षण टाका!
दिवा येथे महापालिका प्रशासनाने अनेक भूखंडांवर आरक्षण टाकले होते. मात्र त्याच भूखंडांवर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. हा सर्व प्रकार महापालिका अधिकाऱयांच्या आशीर्वादाने घडला आहे. प्रशासनाने शेतजमिनीवर आरक्षण टाकून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यापेक्षा मोकळय़ा जागांवर, शासकीय जागांवर आरक्षण टाकावे, अशी मागणी शिवसेना दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.