आजपासून आठ दिवस 30 टक्के पाणी कपात, ठाणेकरांनो हेडे, कळशा, बादल्या, ड्रम भरून ठेवा

ठाणेकरांनो, थंडीत कुडकुडत असलात तरी कंटाळा करू नका.. चला उठा, आधी घरातील हंडे, कळशा, बादल्या, ड्रम पाण्याने भरून ठेवा आणि मगच कामावर जा. उद्या 3 डिसेंबरपासून ठाणे महापालिकेने 30 टक्के पाणी कपात केल्याने तुम्हाला ‘बंदोबस्त’ करावाच लागेल. नाहीतर पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल. आठ दिवस ही पाणी कपात राहणार असून आतापासूनच तजवीज करून ठेवावी लागणार आहे. पुरेसे पाणी भरून ठेवले तर कामावर निवांत जाता येईल. मुलांची शाळाही बुडणार नाही. भातसा धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट झाल्याने आठ दिवस थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेनेदेखील पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे पालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. तसेच पिसे येथील केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीचे काम 1 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे 5 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण 30 टक्के पाणी कपातीचा ठाणेकरांना सामना करावा लागणार आहे.

काटकसर करा !

संपूर्ण पालिका क्षेत्रास दररोज 30 टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी विभागवार सकाळी 9 ते दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 या वेळेत एकेका विभागाचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून पालिकेस सहकार्य करावे, अशी आवाहन करण्यात आले आहे.

या प्रभागात पाणीबाणी

3 डिसेंबर – माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली.

4 डिसेंबर – गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपूरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्रीनगर 1 व 2, मैत्री पार्क.

5 डिसेंबर – सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकूळनगर, आझादनगर, खोपट, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
रोड परिसर.

6 डिसेंबर दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेशनगर, उदयनगर, रेतीबंदर, सम्राटनगर, नारायणनगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजयनगर परिसर.

7 डिसेंबर राबोडी 1 व 2, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कळवा, मनीषानगर, आतकोणेश्वरनगर, भास्करनगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिकनगर.

8 डिसेंबर – लोकमान्य पाडा नं. 1, 2, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजीनगर, धर्मवीरनगर, साठेवाडी, रघुनाथनगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड.