
गेल्या 3 दिवसांपासून शहरात कचरा साचल्याने सामान्य ठाणेकर त्रस्त झाला आहे. मुंबई महापालिकेतील 1 हजार 400 कोटींच्या कामातून ब्लॅक लिस्ट केलेल्या ठेकेदारासाठी ठाण्याची कचराकोंडी केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान निविदा प्रक्रियेची मुदत पूर्ण झाली असूनही एका ब्लॅक लिस्ट केलेल्या विशिष्ट ठेकेदारासाठी निविदा उघडली नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. या कचराकोंडीला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ठाणे शहरात कचऱ्याच्या डम्पिंगचा प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. या प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे. तसेच वर्षानुवर्षे सत्ता राबवणाऱ्या पक्षाची कचऱ्यावर तोडगा काढण्याची नैतिक जबाबदारी असताना फक्त दिखाऊपणा करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील कचऱ्याला वारंवार आग लागत असल्याने कचरा गाड्या आणण्यास स्थानिकांनी विरोध केला. शहरात सक्षमपणे कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारू शकले नसल्याने ठाणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील कचरा वेळीच उचलला जात नसल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.