ठाण्यातील 124 शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच; 2 कोटींचा खर्च; एकाच वेळी 28 हजार विद्यार्थ्यांवर लक्ष

बदलापूर येथील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे अशा वाढत्या गुन्ह्यांना आळा बसवा, गुन्ह्याची उकल तत्काळ व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळावे यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ठाणे पालिकेच्या 124 शाळांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार असून यासाठी तब्बल 2 कोटी 96 लाखांचा खर्च पालिका करणार आहे. दरम्यान एकाच वेळी 28 हजार विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, चिमुरड्या मुलींचा विनयभंग आणि अत्याचाऱ्याचा घटना शाळेतच घडू लागल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने शाळेत सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य केले असून ज्या शाळेत या यंत्रणा नाहीत, असा शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत पालिकेच्या शाळा सुरक्षित करण्याचा विचार केला आहे. अद्यावत सीसीटीव्ही यंत्रणा बनवण्यासाठी पालिकेने निविदा काढली आहे. विद्युत विभागाच्या मदतीने येत्या काही दिवसांतच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून
ठाणे महापालिकेच्या 77 इमारतींमध्ये 106 प्राथमिक आणि 2३ माध्यमिक अशा एकूण 129 शाळा आहेत. या शाळेत तब्बल 977 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. शाळेतील सर्व सीसीटीव्हीचे नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून केले जाणार आहे.

इथे बसवणावर कॅमेरे
शाळेतील मैदानात, वरंडा, पॅसेज, जिन्यावर, शौचालयाबाहेर, सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तसेच शाळामधील प्रवेशद्वारावरदेखील संवेदनशील परिसरात असलेल्या शाळेच्या बाहेरदेखील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.