जगप्रसिद्ध ‘फोब्स’ मासिकाने कौतुक केलेल्या ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनने दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या संशोधनात आणखी एक ‘चमकदार’ कामगिरी केली आहे. ‘स्नेकहेड’ मत्स्य प्रजातीतील ‘चन्ना एम्फिबियस’ या दुर्मिळ प्रजातीचा 92 वर्षांनी पुनर्शोध लावण्यात ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनने यश मिळवले आहे. आकर्षक चमकदार रंग असणाऱया ‘चन्ना’ कुळातील नवीन प्रजात पश्चिम बंगालच्या चेल नदीत सापडली आहे. यापूर्वी 1933 मध्ये ही प्रजाती नजरेस पडली होती. तिचे छायाचित्र प्रथमच जगापुढे आले आहे.
ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनच्या माध्यमातून तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संशोधक टीमने ‘चन्ना एम्फिबियस’ प्रजातीचा पुनर्शोध लावला आहे. टीममध्ये प्रवीणराज जयसिन्हा, नल्लाथांबी मौलीधरन, बालाजी विजयकृष्णन व गौरब कुमार नंदा यांचाही समावेश होता. शरीरावरील आकर्षक, चमकदार रंगांच्या माशांच्या प्रजातींना ‘स्नेकहेड’ म्हटले जाते. ‘चन्ना एम्फिबियस’ प्रजातीची आकर्षक रंग ही विशेष ओळख आहे. सर्वप्रथम 1840 मध्ये या प्रजातीचा शोध लावण्यात आला होता. नंतर दृष्टीआड झालेली ही प्रजाती 1933 दरम्यान शेवटची दिसली होती. त्यानंतर 92 वर्षांनी तिचा पुनर्शोध घेण्यात ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनला मोठे यश लाभले आहे.
ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनचे कौतुक
‘चन्ना एम्फिबियस’च्या शोधाची ‘झूटॅक्सा’ नियतकालिकाने दखल घेतली असून संशोधनाला दाद देणारे वृत्त प्रकाशित केले आहे. तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील टीमने दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या संशोधनात घोडदौड कायम ठेवली आहे. त्यामुळे ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनचे सर्वच स्तरांतून काwतुक होत आहे.
ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात पहिल्यांदा शोध
- 1840 मध्ये जॉन मॅकक्लेलँड यांनी या माशाच्या प्रजातीचा शोध लावला होता. मॅकक्लेलँड हे ईस्ट इंडिया कंपनीत वैद्यकीय अधिकारी होते.
- डी. एस. रसेल यांनी चेल नदीतून हा मासा पकडला होता आणि त्याचे नमुने जॉन यांना दिले होते. त्यानंतर 1918 व 1933 मध्ये प्रजातीचे शेवटचे नमुने गोळा करण्यात आले होते.
- सप्टेंबर 2024 मध्ये संशोधकांना हा मासा पश्चिम बंगालच्या कालिम्पाँग जिह्यातील गोरुबथनमधील चेल नदीपात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला होता. गुणसूत्र तपासणी व आकारशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर तो ‘चन्ना एम्फिबियस’ मासा असल्याचे लक्षात आले होते.
दुर्मिळ प्रजातीची खासियत
‘चेल स्नेकहेड’ नावाने ओळखली जाणारी ‘चन्ना एम्फिबियस’ ही प्रदेशनिष्ठ प्रजाती हिमालयीन प्रदेशात आढळणाऱया मोठय़ा ‘स्नेकहेड’ प्रजातींपैकी एक आहे. या प्रजातीचा रंग चमकदार आणि तितकाच आकर्षक आहे. माशाच्या शरीरावर पिवळय़ा व नारंगी रंगाचे पट्टे असून माशाचा कमाल आकार 205 ते 270 मि.मी. इतका आहे.