कोल्हापूरच्या देवराईंमध्ये ‘डाईक्रॅक्स देवराईवासी’, गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधन

दुर्मिळ वन्य जिवांचा शोध लावून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने वन्य जीव संशोधनात आणखी एक यश मिळवले आहे. कोल्हापूर जिह्यातील उत्तर पश्चिम घाटात वसलेल्या तीन देवराईंमधून गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात महाराष्ट्रातील संशोधक यशस्वी ठरले आहेत. गोगलगाईच्या प्रजातीचे नामकरण ‘डाईव्रॅक्स देवराईवासी’ असे केले आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेल्या आंबा गावातील ‘आंबेश्वर देवराई’, पाटगावजवळील ‘श्री स्वयंभू मंदिर देवराई’ आणि गगनबावड्याजवळील तळये गावातील ‘गंगोबा देवराई’ येथे गोगलगाईची नवीन प्रजाती आढळली आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अक्षय खांडेकर, मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ओमकार यादव यांनी संशोधन मोहिमेत सहभाग घेतला.

देवराईमध्ये शोध लागल्याने नवीन प्रजातीचे नामकरण ‘डाईव्रॅक्स देवराईवासी’ असे करण्यात आले आहे. या गोगलगाई देवराईंतील पालोपाचोळ्यांमध्ये आढळल्या. रात्रीच्या वेळी या गोगलगाई जमिनीवर पडलेल्या पानांवर वावरताना आढळतात, तर दिवसा पालापाचोळ्याखालील मातीमध्ये विसावलेल्या आढळतात. सह्याद्रीमधील अनेक गावांनी देवराईंचे जतन केले आहे. या देवराईंमध्ये मानवी हस्तक्षेप होऊ दिला जात नाही. त्यामुळे देवराईंतील समृद्ध जैवविविधता टिकून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची दखल

गोगलगाईच्या नवीन प्रजातीचे वर्णन करणारा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ कॉन्कोलॉजी’ या ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड येथून प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमधून प्रसिद्ध झाला आहे.

‘जर्नल ऑफ कॉन्कोलॉजी’ या ग्रेट ब्रिटन व आयर्लंड आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमधून हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

नवीन प्रजातीची वैशिष्ट्ये

डाईक्रॅक्स कुळातील गोगलगाई त्यांच्या छोट्या आकारावरून, शंखाच्या बाहेर आलेल्या श्वसननलिकेवरून आणि शंखावरील रेघांच्या रचनांवरून वेगळ्या ठरतात.

गोगलगाईची नवीन प्रजाती तिच्या शंखावरील रेघांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेवरून कुळातील इतर गोगलगाईंपेक्षा वेगळी ठरते. या गोगलगाई आकाराने 5 मि.मी.पेक्षा छोट्या आहेत. मान्सूनचा कालावधी हा या गोगलगाईंचा सक्रिय असण्याचा काळ आहे.