विविध दुर्मिळ वन्य प्रजातींच्या संशोधनामुळे जगभरातून वाहवा मिळवलेल्या ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ने आणखी एक रोमांचक शोध लावला आहे. फाऊंडेशनच्या संशोधकांनी गुजरात-उत्तर महाराष्ट्राच्या माळरानावर मागील दहा वर्षे संशोधन सुरू ठेवले होते. या संशोधनात देखणा ‘लिझार्ड’ आढळला आहे. ‘ऑफीसॉप्स’ कुळातील लिझार्डच्या नव्या सुंदर, मोहक प्रजातीचे ‘ऑफीसॉप्स वेनस्टस’ असे नामकरण केले आहे.
केरळपासून गुजरातपर्यंतच्या पश्चिम घाटक्षेत्रात सरडे आणि पालींच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. दक्षिण हिंदुस्थानात ‘ऑफीसॉप्स बेड्डोमी’ प्रजातीचा लिझार्ड आढळतो. तो लिझार्ड आणि गुजरात व उत्तर महाराष्ट्रात आढळलेल्या ‘ऑफीसॉप्स वेनस्टस’मध्ये वैशिष्टय़ांच्या बाबतीत खूप वैविध्य आढळले आहे. देखण्या लिझार्डचा शोध घेण्याच्या मोहिमेला ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ने 2014-15 मध्ये सुरुवात केली होती. संशोधकांनी गुजरात, महाराष्ट्राच्या गवताळ प्रदेशात वन्य प्रजातींचे निरीक्षण सुरू केले होते. संशोधनादरम्यान दक्षिण हिंदुस्थानात आढळणाऱया ‘ऑफीसॉप्स बेड्डोमी’ प्रजातीशी नव्या लिझार्डची तुलना करण्यात आली. खवल्यांची मोजणी करण्यात आली. त्यात अनेक वैशिष्टय़ांच्या बाबतीत दोन्ही प्रजातींमध्ये वेगळेपण दिसून आले. जनुकीय अभ्यासात आठ ते नऊ टक्के फरक दिसला. संबंधित वेगळेपणाचा विचार करून देखण्या लिझार्डला ‘ऑफीसॉप्स वेनस्टस’ अशी नवीन ओळख दिली आहे. ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’चे हे रोमांचक संशोधन दक्षिण आशिया आणि पॅलाएर्क्टिक प्रदेशातील जैवविविधतेवर प्रकाश टाकणारे मानले जात आहे.
‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’च्या माध्यमातून संशोधन मोहिमेत भाग घेणे, दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध घेत त्यांचे नामकरण करणे याचा खूप आनंद वाटतोय. अशा वन्य प्रजातींच्या संवर्धनासाठी सर्वांनीच लक्ष द्यायला हवे. घनदाट जंगलांबरोबरच उंचावरील गवताळ प्रदेशांतही जैवविविधता आहे. हे लक्षात घेऊन गवताळ प्रदेशांच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे.
‘ऑफीसॉप्स वेनस्टस’ या नवीन लिझार्डचे रूप सुंदर आणि मोहक आहे. याच देखण्या रूपावरून नवीन प्रजातीला ‘ऑफीसॉप्स वेनस्टस’ असे नाव दिले आहे. हा लिझार्ड ‘स्नेक-आईज’ ग्रुपमधील आहे. समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचावर असलेल्या गवताळ माळरानावर हा लिझार्ड आढळतो. – हर्षिल पटेल, संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन
तेजस ठाकरे यांच्या टीमचे मोठे यश
‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’च्या माध्यमातून तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने ‘ऑफीसॉप्स वेनस्टस’चा शोध लावला. संशोधकांमध्ये तेजस ठाकरे यांच्यासह हर्षिल पटेल, निवृत्त शास्त्रज्ञ राजू व्यास, जर्मनीतील झिशान मिर्झा, लंडन येथील शौनक पाल यांचा समावेश आहे. त्यांच्या संशोधनाची ‘टॅप्रो बॅनिका’ जर्नलने दखल घेतली आहे.