टेस्ला शोरूमसाठी मोजणार तब्बल 35 लाख भाडे;मुंबईतील पहिले शोरूम बीकेसीत

एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे मुंबईत पहिले शोरूम उघडणार आहे. हे शोरूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे असून कंपनी यासाठी दर महिना 35 लाख रुपये एवढे भाडे मोजणार आहे. टेस्लाने बीकेसीमधील एका कमर्शियल टॉवरच्या तळमजल्यावर 4,000 चौरस फूट जागा घेण्याची तयारी केली आहे. याच ठिकाणी टेस्लाच्या कारचे प्रदर्शन व विक्री केली जाईल.

कंपनी या जागेसाठी मासिक भाडेपट्टा सुमारे 900 रुपये प्रति चौरस फूट म्हणजेच 35 लाख रुपये महिना देईल. हा भाडे करार पाच वर्षांसाठी असेल. एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मस्क यांनी दिल्ली आणि मुंबईत स्टोअर्स उघडणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच मुंबईत टेस्ला कंपनीने 13 जागा भरण्यासाठी जाहिरातसुद्धा काढली होती.