
हिंदुस्थानात प्रवेश करताना टेस्लाने दोन शहरांत रिटेल आऊटलेट सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. दिल्ली आणि मुंबई असे दोन शोरूम उघडण्याची तयारी टेस्लाने सुरू केली आहे. या प्रमुख शहरांमध्ये शोरूमची सुरुवात झाल्यानंतर कंपनी हिंदुस्थानच्या बाजारात पाऊल ठेवेल. टेस्लाने 2023 पासूनच शोरूमसाठी योग्य जागा शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र काही कारणांमुळे उशीर झाला असल्याची माहिती आहे. भरमसाट आयात शुल्कामुळे विदेशी कंपन्या हिंदुस्थानच्या बाजारपेठेत रस दाखवत नव्हत्या. मात्र आता सरकारने आपल्या धोरणात बदल केला असून 40 हजार डॉलर्सहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील सीमा शुल्क 110 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर आणले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान एलन मस्क यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. तेव्हापासून टेस्ला हिंदुस्थानात प्रकल्प उभारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे त्यानंतर टेस्लाने हिंदुस्थानात नोकरभरतीही सुरू केली होती.