मस्क हिंदुस्थानात करणार उद्योग विस्तार, मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झाले असून त्यांनी टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांची ऐतिहासिक ब्लेयर हाऊस येथे भेट घेतली. यावेळी मस्क यांची पत्नी आणि मुलेही उपस्थित होती. मस्क यांनी भेटवस्तू देऊन मोदींचे स्वागत केले. मोदी आणि मस्क यांच्यात अंतराळ मोहीमा, इलेक्ट्रिक गाड्या आणि हिंदुस्थानात अद्ययावत तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या दृष्टीने उद्योग वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. मस्क यांनी  टेस्लाचा विस्तार हिंदुस्थानातही करण्याबाबत आणि इलेक्ट्रिक गाडया व अंतराळ क्षेत्राबाबत करार करण्याच्या दृष्टीने रस दाखवला.

मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात दहशतवाद, सायबर सुरक्षा इत्यादींबद्दल  चर्चा झाली.  त्यानंतर  मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ यांची भेट घेतली.

बेकायदा स्थलांतरितांबद्दल ट्रम्प यांना विचारणार का?

मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची  शुक्रवारी भेट होणार असून दोघांमध्ये सुमारे पाऊण तास संभाषण होणार आहे. बैठकीत दोन्ही नेते आयात शुल्क, बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा तसेच द्वीपक्षीय व्यापार, सुरक्षाविषयक करार अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोदी बेकायदा स्थलांतरितांना दिलेली वागणूक आणि अतिरीक्त आयातशुल्काबद्दल ट्रम्प यांना विचारणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.