लक्षवेधी -जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी

टेस्लाचे 46 हजार सायबर ट्रक रिकॉल

अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने जवळपास 46 हजार सायबर ट्रक परत मागवले आहेत. सायबर ट्रकमधील बाहेरील पॅनेलमध्ये समस्या उद्भवल्याने हे सायबर ट्रक परत मागवण्यात आले आहेत. या मॉडेलची ही आठवी आणि सर्वात मोठी रिकॉल आहे. परत मागवलेल्या वाहनांमध्ये 13 नोव्हेंबर 2023 ते 27 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या सर्व
मॉडेल्सचा समावेश आहे.

अमेरिकन गन्स एन रोझेसचा मुंबईत शो

जानेवारीत प्रसिद्ध बँड ‘कोल्डप्ले’ ने भारतात लाईव्ह कॉन्सर्ट सादर केल्यानंतर आता प्रसिद्ध अमेरिकन बँड ‘गन्स एन रोझेस’चा येत्या 17 मे रोजी मुंबईत लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला जाणार आहे. आपल्या आशिया दौऱ्याचा भाग म्हणून 12 वर्षांनंतर हा बँड भारतात परतत आहे. 17 मे 2025 रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तिकिटांची बुक माय शोवर विक्री सुरू आहे.

किकचा दुसरा भाग लवकरच येतोय

ब्लॉकबस्टर किक चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येईल अशी आशा असल्याचे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या किक चित्रपटाने माझे आयुष्य बदलले. किक 2 साठी मी खूप उत्साही आहे. पण, या चित्रपटाबद्दल साजिद नाडियादवाला आणि सलमान खान हेच निश्चित काय ते सांगू शकतील. परंतु, मला खरोखर आशा आहे की ते लवकरच होईल कारण ‘किक’ ब्रँडला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे, असे अभिनेत्रीने स्पष्ट केले.