>> प्रसाद ताम्हणकर
प्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीतले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे एलॉन मस्क होय. हा माणूस त्याच्या नानाविविध उद्योगांमुळे, अफाट आणि अचाट कल्पनांच्या सादरीकरणामुळे कायम चर्चेत असतो. जगभरातील तरुणाईत हा माणूस अगदी आयडॉल म्हणून ओळखला जातो. लाखो चाहत्यांना त्याच्या नवनव्या कल्पनांची कायम भुरळ पडत असते. असा हा प्रख्यात मनुष्य सध्या चीनच्या दौऱ्यावर आहे. त्याच्या या चीनच्या दौऱ्यावरून सध्या अनेक सुरस चर्चा विविध माध्यमांमध्ये रंगत चाललेल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटी एलॉन मस्क हा हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येण्याची चर्चा रंगलेली असताना, अचानक त्याने आपला हिंदुस्थानचा दौरा पुढे ढकलल्याचे जाहीर केले. हिंदुस्थानचा दौरा रद्द करून मस्क चीनला धावल्याने, त्याचे हिंदुस्थानी चाहते आणि मस्क हिंदुस्थानसाठी जणू कुबेराचा खजिना आणणार अशा भ्रमात असलेले अनेक लोक निराश झाले आहेत.
टेस्ला या त्याच्या कंपनीत त्याच्यावर असलेल्या अनेक जबाबदाऱयांमुळे हिंदुस्थानचा दौरा पुढे ढकलला असून, वर्षाच्या शेवटी हा दौरा करण्याची आशा मस्कने व्यक्त केली. मात्र इतक्या जबाबदाऱ्या असतानाही चीनला जाण्यासाठी त्याने वेळ कसा आणि का काढला, हा प्रश्न अनेकांना पडला. अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने टेस्लाच्या ड्रायव्हर असिस्टंट सिस्टमच्या सुरक्षेसंदर्भात तपासणी सुरू असल्याचे जाहीर केल्यानंतर लगेच काही दिवसांनंतर मस्कने चीनचा दौरा आखल्याचे समोर येत आहे. वाहन विश्वातील तज्ञांच्या मते, चीन ही टेस्लाची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. टेस्लाला चीनमध्ये फुल सेल्फ ड्रायव्हिंग (FSD) अधिक सक्षम करायचे आहे. मुख्य म्हणजे त्याच्या अल्गोरिदमला प्रशिक्षित करण्यासाठी जो डाटा गोळा करण्यात आला आहे, तो त्याला परदेशात हस्तांतरित करायचा आहे.
टेस्लाच्या गाडय़ांचा फुल सेल्फ ड्रायव्हिंग मोड हा अमेरिकेत कार्यरत आहे, मात्र अजून तो चीनमध्ये सुरू करण्यात आलेला नाही. फुल सेल्फ ड्रायव्हिंग मोड चीनमध्ये कार्यरत करण्यासाठी तेथील अधिकाऱयांना त्यासंदर्भात आश्वस्त करणे जास्त महत्त्वाचे आहे. तिथल्या स्थानिक कायद्यानुसार चिनी ग्राहकांच्या गोळा केलेल्या डाटावर प्रक्रिया करण्यासाठी टेस्लाने शांघायमध्ये एक डाटा सेंटर उभारण्याची तयारीदेखील सुरू केलेली आहे. मात्र अमेरिकेत नुकत्याच जाहीर झालेल्या एका रिपोर्टनुसार टेस्लाच्या गाडीतील ऑटोनॉमस ड्रायव्हिंग मोडमुळे 13 अपघात घडले असून, त्यात एका व्यक्तीचा मृत्यूदेखील झाला आहे. मात्र, चीनच्या मीडियानुसार मस्क चीनबरोबर सहकार्य वाढवण्यास उत्सुक असून, चीनने आपली बाजारपेठ ही विदेशी कंपन्यांसाठी कायम खुली असेल असे आश्वासन मस्कला दिले आहे.
काही वाहनतज्ञांच्या मते, एलॉन मस्कची कार कंपनी टेस्ला सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहे. जगभरातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठय़ा प्रमाणावर कमी होत चाललेली आहे. त्यात स्वस्त चिनी उत्पादकांनी मोठी स्पर्धा उभी केल्याने टेस्लाच्या शेअरची किंमत उतरली आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये टेस्लाच्या ऑटोमोटिव्ह विक्रीत 13 टक्क्यांनी घट झाली आहे. ही विक्री 17.3 अब्ज डालरवरून 13.7 अब्ज डालरने कमी झाली आहे. टेस्लाच्या एकूण विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 9 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. तर 2024 मध्ये टेस्लाच्या शेअरची किंमत 32 टक्क्यांनी घसरली आहे. या स्पर्धेत पुन्हा झेप घेण्यासाठी आणि शेअरच्या किंमती वाढवण्यासाठी मस्क सातत्याने फुल ऑटोनॉमी ड्रायव्हिंगवर जोर देत असल्याचा आरोपदेखील केला जात आहे.
उत्पादन आणि किंमत यांचा मेळ जुळवण्यासाठी टेस्लाने आपल्या किमतीमध्ये वारंवार बदल करायला हवेत, असे मत खुद्द मस्क याने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर व्यक्त केले होते. त्यानंतर आता मागणी वाढवण्यासाठी टेस्ला कंपनी चीन आणि इतर बाजारपेठांमध्ये आपल्या कारच्या किंमती कमी करत आहे. चीनच्या स्थानिक कंपन्यांनी टेस्लाला तगडे आव्हान दिले असताना, मस्क हिंदुस्थानात नव्या संधी शोधत आहे हे नक्की. मात्र हिंदुस्थानची भेट टाळून त्याने चीनला दिलेली भेट नक्की त्याचा काय फायदा करून देणार आहे हे भविष्यात दिसेलच.