जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; 6 जवान जखमी, तीन दिवसात हल्ल्याची तिसरी घटना

जम्मू-कश्मीरच्या डोडा येथे रात्री उशिरा लष्कराच्या तळावर हल्ला केल्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारात पाच जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) जखमी झाले.

कठुआमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक जखमी झाल्याची आणि रियासीमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची जम्मूमध्ये तीन दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

दहशतवादविरोधी मोहिमेवर नजर ठेवून असलेल्या जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितलं की, कठुआ येथे काल रात्री झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

डोडा घटनेबाबत ते म्हणाले की, काल रात्री उशिरा चत्तरगाला भागातील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त दलावर गोळीबार केला. हा भाग भूभाग उंचावर असून सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ड्रोनच्या मदतीनं सुरक्षा दल उरलेल्या दहशतवाद्याचा शोध घेत आहेत. कठुआच्या हिरानगर भागात ही शोध मोहीम सुरू आहे.

जैन यांनी कठुआ हल्ल्याला ‘ताजी घुसखोरी’ म्हटलं आणि नाव न घेता पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

ते म्हणाले, ‘आपला शत्रु शेजारीच असून आपल्या देशातील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतो. ही (हिरानगर दहशतवादी हल्ला) ताजी घुसखोरी असल्याचं दिसत आहे. एक दहशतवादी मारला गेला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे’, असं ते म्हणाले.