पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभात स्फोट घडवला, खलिस्तानी संघटनेचा दावा; मेलद्वारे स्वीकारली जबाबदारी

प्रयागराज येथील महाकुंभात झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. अशा आशयाचा मेल प्राप्त झाला असून हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. यामागे कोणालाही हानी पोहोचवण्याचा उद्देश नसून केवळ जोगी (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) आणि त्यांच्या कुत्र्यांसाठी हा इशारा होता. पिलीभीत बनावट चकमकीत आमच्या तीन भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ’खालसा’ तुमच्या अगदी जवळ आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असे मेलमध्ये नमूद आहे.

फतेह सिंग बागी असा उल्लेखही मेलमध्ये आहे. रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दोन सिलेंडरच्या स्फोटामुळे मोठी आग लागली. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले पण या दुर्घटनेत 180 तंबू जळाले.

गतवर्षी 23 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. पंजाबमधील पोलीस चौकीवर हल्ला करून दहशतवाद्यांनी पिलीभीतमध्ये आश्रय घेतला होता. पंजाब पोलिसांनी पिलीभीत पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपींना पंठस्नान घालण्यात आले. पोलिसांच्या चकमकीत जसनप्रीत सिंग, गुरविंदर सिंग आणि वीरेंद्र सिंग हे तीन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन एके-47 रायफल आणि दोन विदेशी पिस्तूल जप्त करण्यात आली.

सिलेंडरची तपासणी बंधनकारक

कुंभमेळ्यातील आगीच्या घटनेनंतर राज्य सरकारने सिलेंडर तपासणे अनिवार्य केले आहे. भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उत्तर प्रदेशच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने आज बैठक घेतली आणि सिलेंडर तपासणी अनिवार्य केली. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, अग्निशमन दल, एलपीजी सिलेंडर वितरक आणि गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीत जारी केलेल्या सूचनांनुसार सिलेंडर तपासणी बंधनकारक असेल. गळती आढळल्यास सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाईल. उत्तर प्रदेश सरकारने निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली.