पाकिस्तान हादरले; प्रवासी वाहनांवर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार, 50 जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम जिल्ह्यातील आदिवासी भागात प्रवासी वाहनांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 50 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्य सचिव नदीम नस्लम चौधरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पाकिस्तानमधील कुर्रम जिल्ह्यातील आदिवासी बहुलभागात प्रवाशी वाहनांवर बंदुकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार केला. प्रवासी वाहनांचे दोन ताफे होते. एक ताफा पारचिनारहून पेशावरकड, तर दुसरा ताफा पेशावरहून पारचिनारकडे जात होता. याच दरम्यान हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच, महिलांचा आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवासी वाहन जेव्हा लोअर कुर्रममधील ओचुत काली आणि मंडुरी जवळून जात होते, तेव्हाच दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी वाहनांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला असून 14 जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.

गेल्या अनेक दशकांपासून अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात सशस्त्र शिया आणि सुन्नी मुस्लिमांध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे हा हल्ला झाला असावा, असं बोललं जात आहे. या घटनेची अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी घेतलेली नाही. काल सुद्धा पाकिस्तानात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 12 सुरक्षा जवान आणि 6 हल्लेखोर मारले गेले होते.