शेतात काम संपवून घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत रस्त्याकडेला थांबलेल्या महिला मजुरांना 16 चाकी मालवाहतूक ट्रकने चिरडले. यामध्ये सहा महिला जागीच ठार झाल्या, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर-कराड रस्त्यावर चिकमहूद गावाजवळील बंडगरवाडी येथे हा भीषण अपघात झाला. अपघातातील सर्व महिला कटफळ येथील रहिवासी असून, अपघाताची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
इंदूबाई बाबा इरकर (वय 50), भीमाबाई लक्ष्मण जाधव (वय 45), कमल यलाप्पा बंडगर (वय 40), सुलोचना रामा भोसले (वय 45), अश्विनी शंकर सोनार (वय 32) जागीच ठार झाल्या, तर मनीषा आदिनाथ पंडित (वय 35) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मीनाबाई दत्तात्रय बंडगर (वय 50) आणि मनीषा पंडित या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.
सांगोला तालुक्यातील कटफळ गावातील शेतकाम करणाऱया महिला मजूर चिकमहूद येथील शेतकऱयाच्या शेतात सकाळी कामासाठी आल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास काम संपवून घराकडे परत जाण्यासाठी त्या पंढरपूर-कराड रस्त्यावर चिकमहूद गावाजवळ बंडगरवाडी बसथांब्यावर एसटीची वाट बघत थांबल्या होत्या. या वेळी पंढरपूरहून 16 चाकी मालवाहतूक ट्रक (एमएच-50, एन-4757) वळणावर वळत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने शेतमजूर महिलांना चिरडले. यात सहा महिला मजूर ठार झाल्या, तर दोन महिला जखमी झाल्या. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर येथे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी ही गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालक सूरज रामचंद्र वीर (रा. कराड, जि. सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार संतोष कणसे, शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, दिग्विजय पाटील यांनी भेट देऊन अपघाताची सविस्तर माहिती जाणून घेतली.