सहा सूत्री करारानंतरही हिंदुस्थान-चीनमध्ये पुन्हा तणाव, चीनने केली दोन प्रांतांची घोषणा; हिंदुस्थानकडून कडाडून विरोध

हिंदुस्थान आणि चीनमध्ये अलीकडेच सहासूत्री करार झाला होता. हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी 18 डिसेंबर रोजी विविध द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानुसार सीमांवर शांतता प्रस्थापित करण्यावर दोघांचे एकमत झाले. त्यानंतर काही दिवसांतच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चीन आणि हिंदुस्थानमधील नवा वाद चव्हाट्यावर आला आहे. लडाखच्या काही भागावर चीनने दावा ठोकल्याने अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा इशारा हिंदुस्थानने दिला आहे.

चीनने गेल्याच महिन्यात होतान येथे दोन नव्या प्रांतांची घोषणा केली आहे. या प्रांतांचा काही भाग लडाखमध्ये येतो. त्यामुळे चीनचे हे अतिक्रमण असून ते हिंदुस्थान कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जायस्वाल यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. हिंदुस्थानने चीनच्या या अतिक्रमणाचा स्वीकार केलेला नसून चीनच्या या घोषणेचा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही, असा विश्वासही जायस्वाल यांनी व्यक्त केला आहे. चीनच्या या अतिक्रमणाला कुठल्याही स्थितीत मान्यता मिळणार नसून राजनैतिक माध्यमातून याप्रकरणी तक्रारही करण्यात आल्याचे जायस्वाल यांनी सांगितले.

अशाप्रकारे झाले चीनचे अतिक्रमण

चीनने गेल्या महिन्यात होतान येथे हेआन आणि हेकांग या दोन नव्या प्रांतांची स्थापना करण्याची घोषणा केली होती. या प्रांतांचे काही भाग हिंदुस्थानातील केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये येतो. हिंदुस्थानकडून चीनच्या या घोषणेचा कडाडून विरोध करण्यात आला आहे. संबंधित भाग हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून चीनचा दावा पूर्णपणे अवैध असल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे.

ब्रम्हपुत्रा नदीवरील धरणालाही विरोध

ब्रम्हपुत्रा नदीशी निगडितही एक मुद्दा आहे. चीन ब्रम्हपुत्रा नदीवर एक धरण बनवत आहे. या धरणालाही हिंदुस्थानचा विरोध आहे. चीन तिबेटमध्ये यारलुप त्यांगपो म्हणजेच ब्रम्हपुत्रा नदीवर एक धरण बांधणार असून वीजप्रकल्प उभारण्यासाठी हा खटाटोप असल्याचे आम्हाला समजले आहे. परंतु, या नदीचे पाणी हिंदुस्थानात येते आणि त्याचा आम्ही वापर करतो. त्यामुळे या धरणाला आपला विरोध राहील असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जायस्वाल यांनी सांगितले.