
गावातील कामांचा ठेका आपल्याच माणसांना मिळावा यासाठी वाशीवली ग्रामपंचायतीत मोठा टेंडर घोटाळा घडला आहे. टेंडरमध्ये स्पर्धाच नको म्हणून सरपंचांचे पंटर चक्क ग्रामपंचायत कार्यालयात घुसले आणि प्रतिस्पर्धी ठेकेदारांच्या निविदांची पाकिटे घेऊन पळून गेले. यावेळी विरोधी गटाच्या सदस्यांनी अटकाव केला असता या पंटरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत वाशीवलीचे सरपंच सखाराम पवार यांनी २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ या सलग तीन वर्षांकरिता शासनाकडून आलेल्या मागासवर्गीय १५ टक्के निधी व पंधराव्या वित्त आयोगामधून आलेल्या २६ लाख रुपयांचा निधी खर्चच केला नाही. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश मोरे, रोहिणी कडव यांनी जिल्हा परिषद यांच्याकडे रीतसर अर्ज करून आवाज उठवला. अनेक वेळा तक्रारींचा पाठपुरावा केल्यानंतर मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांनी सदर निधी खर्च करण्याकरिता परवानगी दिली. त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीत विविध कामांकरिता जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य रोहिणी कडव या निविदा प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग करण्याची परवानगी घेण्याकरिता आल्या होत्या. त्यावेळी सरपंचांचे पंटर नंदकुमार पाटील, मदन पाटील हे ग्रामपंचायत कार्यालयात आले आणि त्यांनी निविदांची पाकिटे पिशवीत घालून पळ काढला. ग्रामपंचायत सदस्य रोहिणी कडव, माजी सदस्य रणजीत पवार यांनी विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करून ते पळून गेले.
झालेल्या कामांचा टेंडरमध्ये
समावेश दोन वर्षांपूर्वी झालेली कामेही निविदा प्रक्रियेत दाखविण्यात आली आहेत. या कामांची पुन्हा बिले काढण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे असा आरोप ग्रामपंचायत सदस्य अविनाश मोरे, रोहिणी कडव, रणजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी वासंती पवार, कांता वाघमारे, बायजी वाघमारे, हरिश्चंद्र पवार, सखाराम वाघमारे उपस्थित होते