मुंबई, ठाणे, भिवंडीत 10 टक्के पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. हे काम 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर असे पाच दिवस करण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्तीमुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि भिवंडीच्या पाणीपुरवठय़ात पाच दिवस 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे, पुरेशा पाण्याचा साठा करून ठेवावा व मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.