
लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आता विधानसभा निवडणुकाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच नेतृत्वात लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या जाणार असल्याने काँग्रेसने दहा जणांची समन्वय समिती नेमली आहे. त्यात मुंबईसाठी तीन नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशान्वये ही समिती गठीत केली आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने जागावाटपाबाबत चर्चांसाठी दिल्लीतून वरिष्ठ नेते प्रत्यक्ष दरवेळी येऊ शकत नाही. त्यामुळेच काँग्रेसने महाराष्ट्रात ही समिती नियुक्त केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नितीन राऊत यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे, तर मुंबईतील जागावाटपासाठी खासदार वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश समितीत आहे.