पनवेल शहरातील नवोदित खेळाडूंना सराव करता यावा यासाठी पनवेल महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे काम रखडले असून दहा कोटींचे काढलेले टेंडर कोणाच्या घशात घातले, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केली आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील रस्त्यांनादेखील ग्रहण लागले आहे. ठिकठिकाणी खड्डेड् पडत असल्याने नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे. एकीकडे अशी परिस्थिती असतानाच दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराज मैदानाकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. या मैदानावरील झाडेझुडपे वाढली असून खेळाडू मैदानाचा उपयोग करणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठीच सोयीस्करपणे धोरणे राबवली जात असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे.
चांगले रस्तेही पुन्हा उखडले
खारघरमधील लिटिल वर्ल्ड ते हिरानंदानीपर्यंतचा चांगला असलेला रस्ता पुन्हा उखडून त्याचे नव्याने टेंडर काढले आणि कामही सुरू केले. मुर्वी गाव ते सेंट्रल पार्कपर्यंतचे रस्तेदेखील खड्डेमय झाले असून महापालिकेने या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी, त्यांच्या जीवाशी खेळू नये असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. कर्नाळा स्पोर्ट्ससमोरील चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्याचेदेखील पुन्हा टेंडर काढले असून ही उधळपट्टी कशासाठी, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.