टीम इंडियाच्या विजयी परेडदरम्यान क्रिकेट प्रेमींची तब्येत बिघडली, 10 जण रुग्णालयात दाखल

टी-20 वर्ल्ड कप जिंकून मायदेशी परतल्यानंतर हिंदुस्थानी संघासाठी मरीन ड्राईव्हवर विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आणि खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह उपनगरांतील लाखो क्रिकेट प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र या गर्दीमुळे काही लोकांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. गर्दीमध्ये धक्काबुक्कीमुळे काही जण जखमी झाले तर काहींना श्वास घ्यायला त्रास झाल्याचे कळते.

जवळपास 10 जणांना जीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांना दुखापत झाली तर काहींना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्याने रुग्णालयात भर्ती करण्यात आले. यापैकी 8 जणांना उपचार करून काही वेळाने घरी सोडण्यात आले, तर दोघांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. जीटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी या वृत्तला दुजोरा दिला आहे. एकावर बॉम्बे रुग्णालयात तर एकावर सेंट जॉर्जेसवर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मरीन ड्राईव्हवर तीन किलोमीटरपर्यंत क्रिकेट प्रेमींची गर्दी उसळली होती. आपल्या खेळाडूंना पाहण्यासाठी खास हिंदुस्थानी क्रिकेट संघाची जर्सी परिधान करून लाखो क्रिकेट प्रेमींनी हजेरी लावली होती. विजयी परेडनंतर हिंदुस्थानी संघ वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाला. यावेळी क्रिकेट प्रेमींनी जल्लोषात त्यांचे स्टेडियमवर स्वागत केले.

खेळाडूंनीही क्रीडाप्रेमींना अभिवादन करत त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानले. विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर हिंदुस्थानच्या खेळाडूंनी संपूर्ण मैदानात फेरी मारत चाहत्यांना अभिवादन करत टी-शर्ट आणि टेनिस चेंडू प्रेक्षकांत फेकत सरप्राईज गिफ्टही दिले.