पुण्यात गुटखा वाहतूक करणारे टेम्पो पकडले; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याची अवैध वाहतूक, विक्री सुरू असल्याचे वारंवार समोर आले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी गुटख्याची वाहतूक करणारे दोन टेम्पो पोलिसांनी पकडले. टेम्पोमध्ये 8 लाख 58 हजारांचा प्रतिबंधीत असा विमल पान मसाला आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह दोन टेम्पो असा तब्बल 18 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सौरभ उर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (24, रा. थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम बाळकृष्ण निंबाळकर (26) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असे असले तरी पुण्यात गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे दिसत आहे. मागील अनेक कारवायांमधून हे अधोरेखित झाले आहे. शहरातील छोट्या मोठ्या टपर्‍यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध होतो. शुक्रवारी दुपारी भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर येथून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती अंमलदार संजय भापकर यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून टेम्पोला अडविले. टेम्पोची तपासणी केली तेव्हा आतमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. अटक करण्यात आलेले दोघे भाऊ असून यातील एक रेकॉर्डवरील आहे. त्यांनी पुण्यात विक्री करण्यासाठी हा गुटखा आणला होता. हा गुटखा कुणाच्या सांगण्यावरून तसेच कोठून आणला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण, महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.