टेम्पोची दुचाकींसह पादचाऱ्यांना धडक; राहुरीत भीषण अपघात

मालवाहतूक टेम्पो चालकाने दोन दुचाकी आणि पायी चाललेल्या तिघा नागरिकांना ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला. अपघातातील दोघा जखमींना उपचारार्थ दवाखान्यात हलविण्यासाठी राहुरी खुर्द येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

चैतन्य विनायक लांबे (वय 18, पिंप्री अवघड, ता. राहुरी), शिवाजी अभिमन्यू जाधव (वय 38, रा. उजनी, ता. माढा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत, तर सानीया सेनानी (वय 17, रा. मध्य प्रदेश) हा जखमी झाला आहे.

नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी खुर्द हद्दीतील साती आसरा देवस्थानजवळ आज सकाळी हा भीषण अपघात झाला. टेम्पोचालक टेम्पो घेऊन नगरकडून राहुरी दिशेला जात होता. राहुरी खुर्द हद्दीत आल्यानंतर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे चाललेल्या दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात चैतन्य विनायक लांबे हा शाळकरी विद्यार्थी तसेच दुसऱया दुचाकीवरील शिवाजी अभिमन्यू जाधव हे जागीच ठार झाले, तर दुचाकीवरील सानीया सेनानी हा जखमी झाला आहे.

टेम्पोने दुचाकींना धडक दिल्यानंतर रस्त्याने पायी चाललेल्या पठाण नामक व्यक्तीला धडक दिली. यात ते जखमी झाले आहेत. अपघातानंतर राहुरी खुर्द ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेस घटनास्थळी पाचारण करून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यास मदत केली. दरम्यान, जखमींवर उपचार करण्यासाठी राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्याने उपस्थित शेकडो तरुणांनी डॉक्टरांच्या दुर्लक्षित कारभाराबाबत चांगलाच संताप व्यक्त केला. अपघातातील दोघा जखमींना उपचारार्थ नगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.

अपघाताच्या घटनेमुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. रविवारी दुपारी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर चैतन्यचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

क्लासवरून घरी जाताना काळाचा घाला

अपघातात ठार झालेला चैतन्य लांबे हा राहुरी कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. राहुरी येथे क्लास सुटल्यानंतर पिंप्री अवघड येथे घरी जात असताना टेम्पोमुळे चैतन्यला नाहक जीव गमवावा लागला. चैतन्यच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. चैतन्यच्या पश्चात आई व लहान बहीण असा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनाच्या घटनेमुळे पिंप्री अवघड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.