
मुंबई शहर व उपनगरांत सोमवारी यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान नोंद झाले. किमान तापमानात अचानक पाच अंशांची मोठी घट झाली. सांताक्रूझमध्ये पारा पहिल्यांदाच 13 अंशांपर्यंत खाली घसरला, तर कुलाब्यात 19.2 अंश इतके नीचांकी किमान तापमान नोंदवले. तामीळनाडूतील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरताच मुंबईत थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच वर्षअखेरीस कडाक्याच्या थंडीची लाट धडकणार आहे.
गेले काही दिवस मुंबईच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू होता. ‘फेंगल’ चक्रीवादळाने थंडीच्या मार्गात अडथळा आणला होता. चक्रीवादळाच्या प्रभावाने हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढून मधेच उष्णतेत वाढ झाली होती. मात्र रविवारपासून पुन्हा थंडीची चाहूल लागली. किमान तापमान रविवारी 17 अंशांपर्यंत खाली घसरले होते. त्यात सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी पाच अंशांची मोठी घसरण झाली. त्यामुळे मुंबईकर पहाटे चांगलेच कुडकुडले. उपनगरांत अनेक ठिकाणी शेकोटय़ा पेटण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील थंड वाऱयांमुळे मुंबईत थंडीचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस किमान तापमानात मोठी घट नोंद होईल, त्यानंतर काही प्रमाणात तापमानात वाढ होऊ शकते, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
दिवसाही ठंडा ठंडा कूल कूल….
मुंबईकरांनी सोमवारी संपूर्ण दिवसभर हुडहुडी अनुभवली. किमान तापमानाप्रमाणे कमाल तापमानात दोन अंशांची घट झाली. सांताक्रूझमध्ये 31 अंश, तर कुलाब्यात 30 अंश इतके कमाल तापमान नोंद झाले. त्यामुळे अनेक नोकरदार मुंबईकरांनी स्वेटर घालूनच कार्यालय आणि घर गाठले.
z थंड हवेचे ठिकाण मानले जाणाऱया महाबळेश्वरला सोमवारी मुंबईने मागे टाकले. सकाळी मुंबईत 13 अंश इतके नीचांकी तापमान होते. त्याचवेळी महाबळेश्वरमध्ये 15 अंश तापमानाची नोंद झाली. मुंबईकरांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदा महाबळेश्वरपेक्षा अधिक गारठा अनुभवला.