दिवंगत माजी पंतप्रधान, हिंदुस्थानच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी तेलंगणा सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने मनमोहन सिंग यांना देशातील सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली. तसेच त्यांचा पुतळा बसवण्याच्या प्रस्तावालाही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. टीका होऊनही त्यांनी मौन बाळगले. कधीही संयम सोडला नाही. त्यांना देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत केले. त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिला गेलाच पाहिजे, असे मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तेलंगणा विधानसभेत शोक प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले. देशाची आर्थिक स्थिती चांगली नसताना त्यांनी देशाची धुरा सांभाळली. माहितीचा अधिकार आणि रोजगार हमीसारखे कायदे त्यांचा चिरस्थायी वारसा दर्शवतात, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्य विरोधी पक्ष बीआरएसनेही रेड्डी यांच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिला.