प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. शनिवारी एकूण 139 पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या पद्म पुरस्कारांबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या राज्यावर भेदभाव झाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे.
राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी दिलेल्या नावांचा केंद्र सरकारकडून विचार करण्यात आला नाही. त्यामुळे रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून करण्यात आलेला हा ‘भेदभाव’ तेलंगणातील लोकांचा अपमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पद्म पुरस्कार देण्यासंदर्भात तेलंगणा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अनेक व्यक्तींची नावे पाठवली होती. शिफारस केलेल्या नावांमध्ये लोक गायक आणि गीतकार गद्दार (पद्मविभूषण), शिक्षणतज्ज्ञ चुक्का रमैया (पद्मभूषण), कवी अँडी श्री (पद्मभूषण), कवी आणि गायिका गोराती वेंकन्ना (पद्मश्री) आणि कवी आणि इतिहासकार जयधीर तिरुमला यांचा समावेश आहे. मात्र, केंद्राने त्यांचा विचार केला नाही, असे रेड्डी यांनी सांगितले.
पद्म पुरस्कारांसाठी 139 लोकांची निवड केली असली, तरी तेलंगणातील शिफारस केलेल्या पाच जणांची निवड करण्यात आली नाही, त्याबद्दल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.