
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेलंगणा सरकारने आज एससी अर्थात अनुसूचित जाती आरक्षणात बदल करणारा आदेश जारी केला. त्यानुसार अनुसूचित जातींचे तीन गटात विभाजन करण्यात आले आहे. असे करणारे तेलंगणा हे पहिले राज्य बनले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.
तेलंगणा सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता. आयोगाने अनुसूचित जातींच्या 59 जातींना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात एकूण 15 टक्के आरक्षण देण्यासाठी तीन श्रेणींमध्ये विभागण्याची शिफारस केली. हा कायदा लागू करण्यापूर्वी रविवारी सचिवालयात अंतिम मंत्रिमंडळ बैठक झाली, अशी माहिती रेड्डी यांनी दिली. दरम्यान, गट 1 मध्ये एक टक्का आरक्षण 15 सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित अनुसूचित जातींना दिले आहे. तर गट 2 अंतर्गत 18 अनुसूचित जातींना 9 टक्के आरक्षण आणि गट 3 अंतर्गत 26 अनुसूचित जातींना 5 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.