प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने 100 मीटर अडथळा शर्यतीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विक्रमासह सुवर्ण पदकावर नाव कोरले. मात्र छत्रपती स्नभाजिंगरचा तेजसला तुल्यबळ लढत देणारा महाराष्ट्राचा सिद्धांत थिंगलिया (मुंबई) अर्ध्या शर्यतीत अडखळून खाली पडल्याने त्याचे हक्काचे रौप्य पदक हुकल्याने महाराष्ट्रीयन चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. महिलांच्या 400 मीटर शर्यतीत मुंबईची ऐश्वर्या मिश्रा हिने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
गंगा आंतरराष्ट्रीय अॅथलिट स्टेडियममध्ये रंगलेल्या या लढतीत तेजस शिर्से याने 13.65 सेकंद वेळेसह निर्विवाद वर्चस्व गाजवीत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्याने याआधीचा राष्ट्रीय स्पर्धेतील स्वतःचा 2015 साली केलेला 13.71 सेकंद वेळेचा विक्रम आज मोडीत काढला, मात्र त्याच्या पाठोपाठ धावणारा त्याचा सहकारी सिद्धांत थिंगलिया अखेरचे तीन अडथळे शिल्लक असताना अडखळून खाली पडला अन् त्याचे पदक जिंकण्याचे स्वप्न क्षणात धुळीस मिळाले. या गडबडीत तामीळनाडूच्या आर. मानव याने 14.03 सेकंद वेळेसह रौप्य पदक जिंकले, तर केरळच्या महंमद लाझान याने 14.23 सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले.
महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत ऐश्वर्या मिश्रा हिने स्वतःचाच स्पर्धा विक्रम मोडीत काढत 51.12 सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. या प्रकारातील राष्ट्रीय विक्रम हिमा दास हिच्या नावावर अबाधित आहे. तिने तो 2018 साली केला होता. ऐश्वर्याने या स्पर्धेत 2022 मध्ये केलेला 52.50 सेकंद वेळेचा विक्रम आज स्वतः मोडीत काढला. तामीळनाडूच्या विथया रामराज हिने 54.43 सेकंद वेळेसह रौप्य, तर गुजरातच्या देवयानी झाला हिने 54.44 सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले.
तलवारबाजी महाराष्ट्राची विजयी घोडदौड
38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीमधील दोन्ही प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम राखली आहे. सॅब्रे व फॉईल या दोन्ही क्रीडा प्रकारांमधील वैयक्तिक गटात पदकाच्या आशा आहेत.
महाराष्ट्राच्या कशिश भरड हिने तामीळनाडूच्या बेनी क्युभेई हिच्यावर मात करीत विजयी सलामी दिली. सुरुवातीपासूनच तिने आक्रमक खेळ करीत ही लढत सहज जिंकली. तिची सहकारी शर्वरी गोसवडे हिने केरळच्या एस. सौम्या हिच्यावर नेत्रदीपक विजय मिळविला. गौरी मंगलसिंग या महाराष्ट्राच्या खेळाडूने रीष युथुसेरी या केरळच्या खेळाडूला सहज पराभूत केले. महाराष्ट्राच्या श्रुती जोशी हिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली.
पुरुष गटात मिलिंद जहागीरदार याने बिहारच्या तुषार कुमार याला पराभूत केले, तर त्याचा सहकारी शकीर अंबीर याने हरियाणाच्या सचिन कुमार याचे आव्हान संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्याच मनोज पाटील याला पुढे चाल मिळाली. मात्र तुषार आहेर या महाराष्ट्राच्या खेळाडूचे आव्हान राजस्थानच्या गजेन चौधरी याने संपुष्टात आणले.
राफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची रुपेरी कामगिरी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी धाडसी क्रीडा प्रकारातही काwतुकास्पद वाटचाल कायम राखली आहे. स्पर्धेत प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या धाडसी राफ्टिंग खेळात महाराष्ट्राने रुपेरी यशाला गवसणी घातली.
नेपाळ बॉर्डरजवळील बूम मंदिर नदीच्या किनाऱयावर सुरू असलेल्या राफ्टिंग प्रकारात देवेंद्र कुमार, राखी गेहलोत, कौशिक कुमार व वैष्णवी शिंपी यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने सात किलोमीटर शर्यतीत पदकासाठी शर्थ केली. 35 मिनिटे 31.761 सेकंदांत शर्यत पूर्ण करीत महाराष्ट्राने दुसरे स्थान संपादन केले. कर्नाटक संघाने ही शर्यत 34 मिनिटे 7.967 सेकंदांत पार करीत सुवर्ण पदक जिंकले. हिमाचल प्रदेशच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली. सांघिक मिश्र प्रकारात महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करीत प्रथमच राफ्टिंग प्रकारातील पदक जिंकण्याचा पराक्रम केला. सात किलोमीटर शर्यत तेलंगणा, दिल्ली, हरयाणा. हिमाचल प्रदेश, चंदिगड, उत्तराखंड, कर्नाटकासह आठ संघांत रंगली. सुरूवातीपासून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसरे स्थान कायम राखत रूपेरी यशावर नाव कोरले. पात्रता फेरीतच महाराष्ट्र दुसऱया स्थानावर होता. महाराष्ट्र संघास कर्नल सचिन निकम व संघ व्यवस्थापक विनोद नलावडे यांचे यांचे मार्गदर्शन लाभले.